Wednesday 11 June 2014

शाहरुख खान

सुपरस्टार राजेश खन्नाने आणि सुपरस्टार अमिताभ
बच्चननी आपल्या ऐन उमेदीच्या काळात
समाजासाठी काही केल्याचं एकही उदाहरण सापडणार
नाही. किंबहुना समाजासाठी आपण काही करायचं असतं
हेच त्यांना तेव्हा ठाऊक नसावं इतके ते
आपल्या स्टारडममध्ये मश्गुल होते.
अशावेळी शाहरुख खानने आपल्या समाजासाठी जे
योगदान दिलंय ते मात्र नेहमीच उपेक्षित राहिलंय.
त्यामुळेच त्याला देश सोडून जा म्हणून
सांगणार्यांची संख्या फेसबुकवर प्रचंड आहे.
क्रिकेटपटूने क्रिकेट खेळावं. सिने अभिनेत्याने सिनेमात
अभिनय करावा. दोघांनी खोऱ्याने पैसा ओढावा. एवढंच
आपल्याला माहित असतं.
समाजासाठी त्यांनी काही केल्याची उदाहरणे
तशी दुर्मिळच आहेत. विजय मर्चंट, नाना पाटेकर,
विक्रम गोखले, आमिर खान, सलमान खान, नर्गिस
दत्त, सुनील दत्त. बस्स एका हाताच्या बोटावर
मोजण्याइतकीच नावं आपल्याला सापडतील.
दुर्दैवाने देशातील ३६ खेडेगावातील
हजारो लोकांच्या घरात सोलार एनर्जी देऊन
त्यांच्या आयुष्यात प्रकाश आणणाऱ्या शाहरुख
खानला मात्र आपण देशद्रोही ठरवतो. कारण त्याच हे
महान कार्य कोणालाच माहित नसत. त्याचे
आजोबा देशाच्या स्वातंत्र्यासाठी अनेकवेळा तुरुंगात
गेले होते हे माहित नसल्यामुळे आपण
त्याला देशद्रोही म्हणतो. आपल्या दिवंगत
आईच्या स्मरणार्थ मुंबईच्या एका नामांकित
हॉस्पिटलला सुरुवातीच्या काळात ५० लाख ( आजचे
पाच कोटी ) देणगी देणाऱ्या शाहरुखला आपण
पाकिस्तानात जा म्हणून सांगतो.
सरकारच्या पोलियो मुक्त भारत आणि एड्स कंट्रोल
अभियानाचा तो ब्रांड अम्बेसेडर आहे ह्याकडे आपण
दुर्लक्ष करतो. कधी देशात त्सुनामी आली म्हणून तर
कधी नैसर्गिक आपत्ती कोसळली म्हणून २५-३०
लाखाची मदत देऊन
आपल्या सहकारी कलाकाराना घेऊन कार्यक्रम
आयोजित करून त्यासाठी लाखो करोडो रुपयांची मदत
उभी करणारा शाहरुख मात्र अंधारात
राहतो अपंगाना नोकरीत प्राधान्य मिळावं म्हणून
लढणाऱ्या संघटनांच्या मागे खंबीरपणे
उभा राहणारा शाहरुख दुर्लक्षित होतो. तळागाळतील
मुलांना शिक्षण घेत यावे म्हणून धडपडणारा शाहरुख
आपल्याला ठाऊक नसतो पण वानखेडेमधील
सुरक्षा रक्षकाशी भांडण केले ह्या घटनेला मात्र
अवास्तव प्रसिद्धी दिली जाते.
" नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले तर मी हा देश सोडून
पाकिस्तानमध्ये राहायला जाईन " अशी बाष्कळ
विधाने शाहरुख खानच्या नावावर खपवून
त्याची बदनामी करण्यापेक्षा अशा लोकांनी त्याची यशोगाथा वाचावी.
त्यापासून प्रेरणा घेऊन आयुष्यात खूप
यशस्वी होता येईल आणि देशाची सेवाही करता येईल.
वयाच्या १५ व्या वर्षी त्याचे वडील कॅन्सरने वारले.
तर ऐन तारुण्यात वयाच्या २५ व्या वर्षी दीर्घ
आजाराने त्याच्या आईचाही बळी घेतला. मातृ पितृ
सुखाला पारखा झालेला शाहरुख ह्या अफाट जगात
पोरका झाला होता. आपल्या आई
वडिलांच्या अकाली निधनाने शाहरुख पार कोलमडून
पडला होता. त्यांच्या आठवणीने त्याचा जीव
कासावीस व्हायचा. जगणं त्याला असह्य वाटू लागलं
होतं. पण मरताना आईने सुनावलेले चार धीराचे बोल
त्याला सतत प्रेरणा देत राहिले. " बेटा, शाहरुख.
कधी हिम्मत हारू नकोस. एक दिवस तू खूप
मोठा होशील."
ती प्रेरणा घेऊनच शाहरुख मुंबईत आला.
बॉलीवूडमध्ये त्याची कुणाशीच ओळख नव्हती. पण
दूरदर्शनवरील " फौजी " अन " सर्कस " मालिकेतील
त्याच्या भूमिकांनी बॉलीवूडचा दरवाजा त्याच्यासाठी खुला झाला.
पहिल्याच " दिवाना " चित्रपटातील भूमिकेने त्याने
सर्वांचेच लक्ष वेधून घेतलं. आणि मग कधी शाहरुखने
मागे वळून पाहिलंच नाही. २२-२३ वर्षात त्याने फक्त
५० चित्रपटच केले अन आज तो जगातील सर्वाधिक
कमाई करणारा अभिनेता ठरलाय. आज खरोखरच
शाहरुख खूप मोठा झालाय. पण
तो आभाळाइतका मोठा होईल असं
त्याच्या आईलाही वाटलं नसेल. दुर्दैवाने शाहरुखचं हे
यश पहायला त्याच्या जवळ त्याचे आई वडील
नाहीत.
गेल्या बुधवारी हॉलीवूड आणि बॉलीवूड मधील जगातील
सर्वात श्रीमंत कलाकारांची संपत्ती जाहीर झाली.
त्यात शाहरुख खानने चक्क दुसरा क्रमांक पटकावला.
त्याची आजची संपत्ती आहे ६०० मिलिअन डॉलर.
म्हणजे तब्बल ३५०० कोटी रुपये. पहिल्या नऊ
क्रमांकामध्ये शाहरुख हा एकमेव भारतीय कलाकार
आहे. हॉलीवूडच्या टोम क्रुज, टोम हन्क्स,
जॉनी डेप्स, आर्नोल्ड स्वाझानेगर, सिल्वेस्तर
स्तलियन अशा दिग्गजांना त्याने पार मागे टाकलंय.
दिल्लीच्या फूटपाथवरून फिरणाऱ्या एका तरुणाने
घेतलेली हि प्रचंड झेप तुम्हाला नक्कीच आयुष्यात
खूप प्रेरणा देत राहील.
शाहरुख खानच्या त्या अफाट कर्तुत्वाला अन
त्याच्यातील माणुसकीला माझा त्रिवार सलाम !